प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 21 -गणरायाच्या आगमनाला अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी नागरिकांची लगबग सुरू असून, रविवारी सुटीचा दिवस असल्याने नागरिकांनी सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. बाजारपेठा सजावटीच्या वस्तूंनी फुलून गेल्या आहेत.
गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्याची परंपरा संपूर्ण महाराष्ट्राची असून, त्याला पुणेही अपवाद नाही. करोना काळातील दोन वर्षांत लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. मूर्तीची उंची किती असावी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी नको, प्रसाद वाटपावर मनाई, देखावे नाही, सार्वजनिक कार्यक्रम नाही. यामुळे दोन वर्षे अनेक नागरिकांनी साधेपणानी गणेशोत्सव साजरा केला होता. यंदा गणेशोत्सवावरील निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे नागरिकांनी धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.
सरकारने यावर्षी गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध काढल्यामुळे आम्ही खूप खूश आहोत. आम्ही बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात आहे. त्यासाठी तयारी सुरु केली असून, आज सुट्टी असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलो आहे. यावर्षी प्रचंड महागाई वाढली असल्याने खरेदी करताना विचार करावा लागत आहे.
– राम खरटमोल, ग्राहक
दोन वर्षांनंतर गणेशोत्सव थाटामाटात साजरा करता येणार आहे. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. नागरिकांचा प्रंचड प्रतिसाद आहे. करोनापूर्वी जितकी विक्री होती, त्याहून अधिक विक्री यावर्षी होईल.
– अनिल कांबळे, मखर विक्रेते
आज मी आणि माझे कुटुंब खरेदीसाठी बाहेर पडलो आहे. विविध वस्तू खरेदी करताना खूप आंनद होत आहे; पण वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. भाव जरी वाढले असले तरी आमचा उत्साह कमी झालेला नाही.
– काजल शहा, ग्राहक