जगभरातील जनजीवन करोनामुळे विस्कळी झालेले आहे. परंतु आता ते पुन्हा हळूहळू सर्वसामान्य होण्याकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. करोना पार्श्वभूमीवरच्या काही अटी व शर्तींसह चित्रपट आणि टीव्ही शोचे शूटिंग भारतात सुरू होत असताना आता हॉलीवूडमध्येही “अवतार’च्या सिक्वलचे काम सुरू झाल्याचे वृत्त आहे.
“अवतार 2’शी संबंधित आंतरराष्ट्रीय क्रू विशेष परवानगीसह न्यूझीलंडला दाखल झाले आहेत. या “अवतार’चे दिग्दर्शक जेम्स कॅमरन यांच्यासह 55 जणांच्या टीमचा समावेश आहे. जिथे ते या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, सध्या ते दोन आठवड्यांसाठी सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहेत.
वेलिंग्टन विमानतळावर पोहोचल्यानंतर निर्माते जॉन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. ज्यात सर्वजण फेस मास्क परिधान केलेले दिसतात. विशेष म्हणजे, जॉन यांच्या “टायटॅनिक’ चित्रपटाने ऑस्कर जिंकलेला आहे आणि पुन्हा एकदा वेलिंग्टनमध्ये आल्यामुळे ते आनंदी आहेत.
दरम्यान, बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या “अवतार’च्या सिक्वेलचेही बजेट अधिक आहे. या सिक्वेलबरोबरच 3 अन्य सीक्वलची देखील तयारी करण्यात आली आहे. ज्यांची रिलीज डेट आधीच निश्चित करण्या आलेली आहे.