इंग्रजी माध्यमात परावर्तित करण्याचा विकल्प रद्द
पुणे – अनुदानित मराठी शाळा इंग्रजी माध्यमांच्या शाळांत परावर्तित करण्याचा विकल्प रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
याबाबतची मागणी भाजप शिक्षक आघाडीने शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे केली होती. यावर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांना कार्यवाही बाबत निर्देशही देण्यात आले होते.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सुनील जगताप यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ आंबले, स्वाती वाळके, राजेंद्र खेडेकर, सचिन लंके आदी पदाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयातील प्रभारी शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक, मिलिंद देशमुख, श्रीधर शिंत्रे यांची भेट घेऊन भाजपच्या पत्रावर कार्यवाही करण्याबाबतचे पत्र रद्द करण्याची मागणी केली होती.
भाजप शिक्षक आघाडीची मागणी शासन धोरणांशी विसंगत असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने दिले होते. यावर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी भाजप आघाडीचा अर्ज निकाली काढण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे आदेश अनुराधा ओक यांनी जारी केले आहेत.