बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा फिल्म इंडस्ट्रीतील एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता आहे. हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स मासिकाच्या सर्वाधिक कमाईच्या यादीवरून दिसून येते. या यादीत स्थान मिळविलेला अक्षय हा एकमेव भारतीय अभिनेता आहे. तथापि, करोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनने सध्या त्याच्या चित्रपटांचे प्रदर्शन आणि शूटिंग बंद आहे.
अक्षयचा आगामी “सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पण करोना विषाणूमुळे सिनेमागृह बंद असल्याने त्याचे प्रदर्शन रखडले आहे. त्याचप्रमाणे अक्षयच्या आगामी चित्रपटाचे शूटिंगही लॉकडाऊनमुळे थांबले आहे. मात्र, अक्षय लवकरात लवकर पुन्हा आपले काम सुरू करणार आहे. तसे, आता महाराष्ट्र सरकारने देखील 15 जूनपासून काही निर्बंध घालत शूटिंगला परवानगी दिली आहे.
त्यानंतर अक्षय पहिल्यांदा त्याच्या आगामी “बेल बॉटम’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे समजते. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जुलै महिन्यात अक्षय लंडनला जाणार असल्याची माहिती आहे. दिग्दर्शक रणजित तिवारी यांचा हा बीग बजेट चित्रपट आहे.
दरम्यान, लॉकडाउननंतर चित्रपटगृह उघडताच अक्षयचा “सूर्यवंशी’ आणि “लक्ष्मी बॉम्ब’देखील रिलीजसाठी तयार आहेत. यात त्याच्यासोबत कियारा अडवाणी झळकणार आहेत. “बेल बॉटम’शिवाय अक्षय लवकरच आनंद एल रायच्या “अतरंगी रे’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू शकेल.