नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये रोज गुन्हे घडतात आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अमेठीमधला असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. याच व्हिडीओवरून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने योगी सरकारवर टीका सुरू केली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ काँग्रेस नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्वीटरवर शेअर केला असून गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, आपल्या ट्वीटमध्ये प्रियांका गांधींनी सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. “अमेठीमध्ये दलित मुलीला निर्दयपणे मारहाण झाल्याचा हा प्रकार निंदनीय आहे. योगी आदित्यनाथजी, तुमच्या राज्यात दररोज दलितांच्या विरोधात सरासरी ३४ तर महिलांच्या विरोधात १३५ गुन्ह्यांची नोंद होत आहे. तरीदेखील तुमची कायदाव्यवस्था झोपली आहे”, असं या ट्वीटमध्ये प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.
अमेठी में दलित बच्ची को निर्ममता से पीटने वाली ये घटना निंदनीय है। @myogiadityanath जी आपके राज में हर रोज दलितों के खिलाफ औसतन 34 अपराध की घटनाएं होती हैं, और 135 महिलाओं के ख़िलाफ़, फिर भी आपकी कानून व्यवस्था सो रही है।…1/2 pic.twitter.com/mv1muAMxkr
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 29, 2021
“जर २४ तासांच्या आत या अमानवी कृत्य करणाऱ्या अपराध्यांना अटक केली नाही, तर काँग्रेस पक्षाकडून जोरदार आंदोलन करून तुम्हाला जागं करण्याचं काम केलं जाईल”, असे देखील त्या म्हणाल्या आहेत.
प्रियांका गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीमध्ये दोन व्यक्ती एका मुलीला खाली पाडून तिला मारहाण करताना दिसत आहेत. काही व्यक्ती मोबाईलद्वारे या धक्कादायक प्रकाराचे व्हिडीओ शूटिंग देखील करत आहेत. तर काही महिला मारहाण करणाऱ्यांच्या कृत्याचे समर्थन देखील करत आहेत.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार व्हिडीओमध्ये पलंगावर बसलेली व्यक्ती म्हणजे जिलाबदरमधला कुख्यात गुन्हेगार सूरज सोनी असून मुलीला मारहाण करणारा शुभम उर्फ शाकाल त्याचा साथीदार आहे.
मोबाईल चोरीच्या प्रकरणावरून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सूरज सोनीच्या घरातून एक मोबाईल चोरी झाला होता. या मुलीनेच मोबाईल चोरी केल्याचा आरोप करत तिला मारहाण करण्यात आल्याचे एका वृत्तवाहिनीने दिले आहे.