नवी दिल्ली : असं म्हणतात हौसेला मोल नसतं…पण ही हौस करण्यासाठी आजकाल लोक कोणत्या थराला जातील याचा काही नेम सांगता येत नाही. कारण एका जोडप्याला रिल्स बनवण्यासाठी आयफोनची गरज वाटू लागली त्यात जवळ एवढे पैसे नसल्याने त्यांनी चक्क आपल्या आठ महिन्याच्या बाळाची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बाळाच्या आईला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. बाळाचे वडील जयदेव फरार होते, पण त्यालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान हे प्रकरण शेजारच्या लोकांच्या सर्कतेने उघडकीस आला आहे. शेजाऱ्यांना मूल न दिसल्याने त्यांनी मूल कुठे आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दाम्पत्याच्या वागण्यात अचानक झालेला बदल पाहून त्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी मुलाचा ठावठिकाणा विचारला असता, या दाम्पत्याने पैशाच्या बदल्यात मुलगा विकल्याचे कबूल केले. रील बनवण्यासाठी महागडा आयफोन खरेदी करता यावा, म्हणून असं केल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी या जोडप्याची आयफोन खरेदीसाठी धडपड सुरू होती. अचानक त्यांनी आयफोन विकत घेतला आणि रील बनवण्यासाठी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. ही घटना संशयास्पद वाटल्याने हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच खर्डा परिसरातील एका महिलेकडून या बाळाची सुटका करण्यात आली. या जोडप्याने आपला मुलगा मोबाईल फोन घेण्यासाठी या महिलेला विकला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रियंका घोष नावाच्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली.
शेजाऱ्यांचा आरोप आहे की या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे आणि ती देखील अंमली पदार्थांच्या सेवनात गुंतलेली आहे आणि या जोडप्याला आपली मुलगीही विकायची होती. एका स्थानिक नगरसेवकाच्या म्हणण्यानुसार, हे जोडपे त्यांच्या मुलीलाही विकणार होते. स्थानिक नगरसेवक तारक गुहा म्हणाले, “मुलाची विक्री केल्यानंतर जयदेवने शनिवारी मध्यरात्री मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केला. आम्हाला समजताच आम्ही पोलिसांना कळवले. पोलिसांनी जयदेवला अटक केली.