मुंबई : आमदार निवासातील कपबशी धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता आमदार निवासातीलच शौचालयाच्या दाराजवळच फळं धुतल्याच्या संतापजनक प्रकार समोर आहे. त्यामुळे यासर्व प्रकरावर आता विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, समोर आलेल्या धक्कादायक प्रकारावर आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना, अजित पवार यांनी, आमदार निवासातील कपबशी शौचालयाच्या पाण्याने धुतल्याच्या घटनेची दखल स्वत: विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतली होती. मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की, या प्रकरणात कंत्राटदार, अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील, त्यांच्यावर आम्ही ताबडतोब कारवाई करण्यात येईल. मात्र, त्यानंतरही असा प्रकार घडत असेल, तर चुकीचं आहे. याबाबत सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. अशा घटना सातत्याने घडत असेल तर सरकारचा कंत्राटदारांवर वचक दिसत नाही, असे ते म्हणाले.
नागपूर विधीमंडळ परिसरातील ज्युस सेंटर परिसरातील धक्कादायक प्रकार
शौचालयाच्या प्रवेशद्वारावर ज्युस सेंटरची फळं स्वच्छ केली जातात
हिवाळी अधिवेशनात अनेक आमदार आणि अधिकारी या सेंटरवरुन ज्युस घेतात .शौचालयाच्या बाहेर संत्र्याची साल काढली जाते आणि इतर फळं स्वच्छ केली जातात— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 23, 2022
दरम्यान, गुरुवारी अमोल मिटकरी यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्र सोडले होते. ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा हॅशटॅग वापरून अमोल मिटकरींनी यासंदर्भातील व्हिडीओ ट्वीट केला होता.
हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राट दाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था.#आझादीकाअमृतमहोत्सव. pic.twitter.com/pi5rJnJxfm
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 21, 2022
“हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था,” असं अमोल मिटकरी म्हणाले होते.