नवी दिल्ली : सध्या देशात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच जात आहे. दरम्यान, सिडीनीवरुन परतलेल्या 35 वर्षीय कोरोना विषाणू संशयिताने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाच्या इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिडीनीवरून परतल्यानंतर या संशयिताला दिल्लीतील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच्या कोरोना विषाणूसंदर्भातील चाचण्या अद्यापही आल्या नव्हत्या.
सिडीनीमधून बुधवारी भारतात परतल्यानंतर या व्यक्तीने विमानतळावर डोकं दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला उपचारांसाठी साफदाराजंग रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याची कोरोना विषाणूची चाचणीही करण्यात आली होती. मात्र चाचणीचा अहवाल आला नव्हता, अशी माहिती या रुग्णालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
‘हा तरुण गेल्या वर्षभरापासून ऑस्ट्रेलियात राहत आहे. तो मुळचा पंजाबमधला आहे. तो एअर इंडियाच्या विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. विमानतळावर आल्यानंतर त्याने डोके दुखत असल्याची तक्रार केली. त्याला बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले’, अशी माहिती पोलिस अधिकारी दिपेंदर आर्या यांनी दिली.
गुरुवारी या व्यक्तीच्या शवविच्छेदनाचे अहवाल येणार आहे. ‘त्याला रुग्णालयातील सातव्या मजल्यावर उपचारांसाठी ठेवण्यात आले होते, रुग्णालयात भरती केल्यानंतर काही मिनिटातच त्याने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली’, अशीही माहिती पोलिसांनी दिली. पोलिस त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहेत.