सराफा, मोबाइल मार्केटचे शटर डाऊन
मावळातील दूध, कुक्कुटपालन व्यवसायाला फटका
पिंपरी – फेडरेशन ऑफ असोसिएशन या व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेने पिंपरी-चिंचवडमधील व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, मात्र अमंलबजावणी सुरू केली नसल्याचे बुधवारी दिसून आले. पिंपरी, चिंचवड, भोसरी या प्रमुख बाजारपेठा सुरु होत्या. मात्र सर्वसामान्यांनी करोना विषाणूचा चांगलाच धसका घेतल्याने शहरातील बाजारपेठा सुरू असल्या तरी ग्राहक फिरकतच नसल्याने शुकशुकाट होता. ग्राहकच नसल्याने शहरातील उद्योग व्यापाराचे दररोज सुमारे 6 ते 7 कोटींनी नुकसान होत आहे, असे फेडरेशनचे अध्यक्ष व माजी खासदार गजानन बाबर यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने तातडीने प्रमुख शहरातील मॉल, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यानुसार रविवारपासूनच याची अंमलबजावणी सुरू झाली.
मोबाइल मार्केट, सराफा बाजाराचे मोठे नुकसान
शहरातील कपडा मार्केट, मोबाइल मार्केट, सराफा बाजार, ज्वेलरी मार्केट, हॉटेल या बाजारपेठेतून रोज लाखो रुपयांची उलाढाल होते; मात्र दोन-तीन दिवसांपासून ही उलाढाल निम्म्याहून अधिक घटली. मागील आठवड्यापासून हे व्यापार ठप्पच झाले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या पुढील अडचणीत आणखी वाढ झाली. ऐन लग्नसराईच्या हंगामात अचानक ग्राहकांची संख्या कमी झाल्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त झाले असून, येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी कमी होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.