केस सुरू करण्यासाठी भाड्याने घेतली मुलगी
कासगंज – येथील एका लव्ह जिहाद प्रकरणाला सनसनाटी वळण लाभले आहे. या प्रकरणात ज्या मुलीच्या नावाने कोर्टात लव्ह जिहादची केस सुरू करण्यात आली आहे, तिथे प्रत्यक्ष सुनावणीच्यावेळी आरोपी प्रिंस कुरेशी याच्या विरोधात कोणताही जबाब नोंदवण्यास सदर मुलीने नकार दिला. तिने म्हटले आहे की, या प्रकरणात प्रिंस कुरेशी याला लव्ह जिहादच्या प्रकरणात खोटे अडकवण्यासाठी मला काही लोकांनी पैसे देऊ केले होते.
तिने भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमन चौहान आणि त्यांच्या दोन साथीदारांची नावे घेतली आहेत. त्यांनी मला भाड्याने घेऊन ही खोटी केस उभी करायला लावली, अशी तक्रार तिने पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पण न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले. कासगंजच्या गंजडुंडवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. 15 जुलै रोजी दिल्लीत राहणाऱ्या एका मुलीने या पोलीस ठाण्यात येऊन प्रिंस कुरेशी नावाच्या मुलाने आपली छळवणूक केल्याचा
आरोप केला होता. या मुलाशी आपली फेसबुकद्वारे ओळख झाली. त्याने एक हिंदू नाव धारण करून आपल्याशी सलगी केली नंतर लग्नाचे आमिष दाखवून येथे बोलावून घेतले आणि त्याने नंतर आपल्याशी दुष्कर्म केले अशी तिची तक्रार होती.प्रत्यक्ष भेटल्यावर हा मुलगा मुस्लीम असल्याचे लक्षात आल्याचेही तिने म्हटले होते. हे प्रकरण जेव्हा प्रत्यक्ष कोर्टात गेले त्यावेळी त्यातील तथ्य या मुलीनेच बाहेर आणले आणि भाजप पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आपण या मुलाच्या विरोधात खोटी तक्रार केल्याचे तिने कबूल केले.
यातील प्रिंस कुरेशी याचे अमन चौहानशी व्यक्तिगत वाद होते. त्यातून त्याला धडा शिकवण्यासाठी त्याने आपला वापर केला आहे असे तिने कोर्टात नमूद केले. या प्रकरणात प्रतिक्रिया देताना जिल्हा भाजप अध्यक्ष के. पी. सिंह यांनी सांगितले की, आरोपी अमन चौहान हा पहिल्यांदा भाजपमध्ये होता, पण त्याने नंतर पक्ष सोडला होता. अलीकडच्या काळात तो पुन्हा पक्षात आला होता. त्याच्या विरोधीतील चौकशीत आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करू.