पुणे – चोरीचा आळ घेऊन महाविद्यालयीन तरुणीबरोबर अश्लील कृत्य करुन तिच्याकडील 80 हजार रुपये काढून घेतल्याची धक्कादायक घटना वाघोली भागात घडली. तक्रारदार तरुणीने हरियाणा पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर संबंधित गुन्हा हरियाणा पोलिसांनी लोणीकंद पोलिसांकडे तपासासाठी सोपविला आहे.
या प्रकरणी साक्षी रातुडी, तरन्नुम मलिक, रोहन सहगल, आशुतोष वर्मा आणि महाकृषी तिवारी ( सर्व रा. वाघोली) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हरियाणामधील सिरसा जिल्ह्यातील एका महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेची मुलगी वाघोलीतील एका मॅनेजमेंट इन्सिट्यूटमध्ये शिक्षण घेत आहे.
वाघोली भागात सदनिका भाडेतत्वावर घेऊन ती आरोपी साक्षी, तरन्नुम यांच्याबरोबर राहते. दरम्यान 17 नोव्हेंबर रोजी सदनिकेत चोरी झाली होती. त्या वेळी सदनिकेच्या मालकाने तक्रारदार तरुणीवर संशय व्यक्त केल्याने तिने सदनिका सोडली. ती दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेली. यानंतर साक्षी, तरन्नूम आणि त्यांचे सहकारी रोहन, आशुतोष, महाकृषी यांनी तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. पिडीत तरुणीचे कपडे उतरवून तिला मारहाण केली. या प्रकाराचे त्यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले.
यानंतर तरुणीकडे दोन लाखाची मागणी करुन जबरदस्तीने तीच्या खात्यातील 80 हजार रुपये आरोपींनी स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. तसेच तीचा लॅपटॉप आणि पॉवर बॅंक घेऊन आरोपी पळून गेले. त्यानंतरही तिला आरोपी धमकावत होते. त्यामुळे तरुणी घाबरुण मूळगावी निघून गेली.
तिने आई-वडिलांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हरियाणा पोलिसांनी संबंधित गुन्हा तपासासाठी लोणीकंद पोलिसांकडे तपासासाठी सोपविला. पीडीत तरुणीच्या आईने नोंदवलेला मोबाइल क्रमांक चुकीचा असल्याने पोलिसांना तीच्याशी संपर्क साधता आला नाही. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निखील पवार तपास करत आहेत.