सातारा – एरव्ही सातारकर तसे खूप शांत आणि कायदाप्रिय. मात्र, करोनाच्या दहशतीने उतावळेपणातून सगळाच सातारा मोकाट झाल्याने पोलिसांना कठोर कारवाई सुरू केली. त्यामुळे शहरात सोमवारपासून खऱ्या अर्थाने सक्तीचा लॉकडाऊन सुरू झाला असून सर्व शहरात कमालीचा शुकशुकाट आहे. त्यामुळे सातारकरांना केवळ कायद्याचीच भाषा कळते काय, असा प्रश्न विचारण्याची गरज आहे.
एरव्ही कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगात माणुसकी, शिस्त, संघटन, कर्तव्यतत्परता याचे दर्शन साताऱ्याने वेळोवेळी घडवले आहे. मात्र, करोना संसर्गाचे गांभीर्य सातारकरांना का उमजत नाही, गेले आठ दिवस जत्रा भरवल्याप्रमाणे लोक खरेदीच्या निमित्ताने रस्त्यावर येत आहोत. काही रस्त्यांवर मॉनिंग वॉक, कोही पेठांमध्ये गप्पांचा फड, काही ठिकाणी रात्रीतच सातारा सोडायची परप्रांतियांची तयारी, रस्त्यावर विनाकारण हिंडणाऱ्यांची गर्दी. त्यामुळे लोक आपल्या जीवांसह आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालत आहेत, असे चित्र होते.
सोमवारपासून मात्र साताऱ्यात सक्तीचा लॉकडाऊन दिसून आला. हुतात्मा उद्यान चौक, तहसीलदार कचेरी, शाहू चौक, बोगदा, समर्थ मंदिर चौक, गुरूवार परज, राधिका चौक, कोटेश्वर मंदिर परिसर, चिपळूणकर बाग, धस कॉलनी, पोवई नाका, पारंगे चौक, भुरके कॉलनी, कांगा कॉलनी, कामगार वसाहत सदर बझार, गोडोली चौक येथे पोलिसांनी बॅरिकेटिंग करून शहरात येणारे मार्ग अडवून धरले आहेत. शहरातील सदाशिव पेठ, पोवई नाका, सदरबझार व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंडईवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते.
सातारा पालिकेने शहराच्या वीस प्रभागात 37 टेंपो मंडईची व्यवस्था केल्याने शहरातील मंडईचा लॉकडाऊन सुरू झाला. शाहुपुरी व सातारा पोलीसांच्या वतीने शहरातील रस्त्यांवर ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवण्यात येत आहे. पोलिसांचे संपूर्ण शहरात सातत्याने पेट्रोलिंग सुरू आहे. रस्त्यावरील प्रत्येक नागरिकांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. साताऱ्यात पालिकेचे ऑन फिल्ड सहाशे कर्मचारी वगळले तर साताऱ्यात सक्तीचा शुकशुकाट होता. पोलीस प्रशासनाच्या सक्तीने सातारकरांनी सोमवार घरातच व्यतीत केला.
औद्योगिक वसाहतीतही शांतता
सातारा औद्योगिक वसाहतीत सक्तीच्या लॉकडाऊनमुळे सन्नाटा आहे. लॉकडाऊनच्या नवव्या दिवशी जिल्हयाचे शंभर कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा शासकीय सूत्रांचा दावा आहे. लॉकडाऊनने उत्पादन बंद झाल्याने मंदीचा फटका सातारा जिल्ह्याला बसला आहे.