अमेरिकेतील एक लाख लोक मरण पावण्याचा धोका

करोनामुळे अमेरिकेतील सुमारे एक लाख लोक मरण पावण्याचा धोका असून येत्या दोन आठवड्यात मृत्यूचे प्रमाण वाढेल अशी शक्‍यता त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. देशातील सोशल डिसिंटगचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. न्युयॉर्कमध्ये या रोगाने मरण पावलेल्यांचा आकडा एक हजारापेक्षा अधिक झाल्यानंतर त्यांनी हे निवेदन जारी केले आहे.

त्या प्रांताचे राज्यपाल अँड्रयु क्‍युमो यांनीही या रोगाने हजारो जणांचे बळी जाण्याची शक्‍यता वर्तवली आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले की ही समस्या 1 जूनपर्यंत आटोक्‍यात येईल. सध्या या रोगाचा झालेला फैलाव लक्षात घेऊन अमेरिकेतील निर्बंधांची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवावी लागत आहे असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. सरकारने जे निर्बंध लागू केले आहेत त्याची कडक अंमलबजावणी झाली तर करोनाचा फैलाव व त्यातून होणारे मृत्यू कमी होऊ शकतील असेही त्यांनी नमूद केले. येत्या दोन आठवड्यात मृत्यूंचे प्रमाण वाढेल त्यामुळे नागरिकांनीच योग्य ती दक्षता घेऊन आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

आम्ही करोनावर प्रभावी उपाय योजले आहेत जर आम्ही ते योजले नसते तर 22 लाख लोकांचे बळी गेले असते असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. ट्रम्प यांनी या आधी येत्या ईस्टरपर्यंत म्हणजेच 12 एप्रिलपर्यंत करोनाची स्थिती आटोक्‍यात येईल असे म्हटले होते आता त्यांनी 1 जूनची तारीख दिली आहे. त्या विषयी खुलासा करताना त्यांनी म्हटले आहे की, 12 एप्रिल ही आमची अपेक्षित धरलेली तारीख होती. पण आम्ही आता 1 जूनपर्यंत स्थिती पूर्वपदावर आणू.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.