वॉशिंग्टन – “अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेचा नेता अयमन अल जवाहिरीचा मृत्यू झाल्याचे मानले जात असतानाच वर्ल्ड ट्रेड सेंटवरील दहशतवादी हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त “अल-कायदा’ने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओत जवाहिरी दिसून आला आहे. या व्हिडीओमुळे अमेरिकेला धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.
मागील बऱ्याच महिन्यांपासून जवाहिरीचा मृत्य झाल्याचा दावा केला जात होता. अमेरिकेतील एसआयटीई या गुप्तचर गटाकडून या जिहादी गटाच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. याच गटाच्या तपासामध्ये जवाहिरीने अनेक मुद्द्यांचा उल्लेख असणारे भाषण केल्याचे म्हटले आहे. यामध्ये रशियन लष्करी तळाचाही उल्लेख जवाहिरीने केला.
एसआयटीईच्या निर्देश असणाऱ्या रिटा कॅट्झ यांनी दिलेल्या माहितीनुसार जवाहिरीने तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याचा उल्लेख भाषणात केला नसल्याचे लक्षात आणून दिले आहे. जवाहिरीचा मृत्यू मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये झाल्याचे म्हटले जात होता. यापूर्वी तो मागील वर्षी अशाच एका व्हिडीओमध्ये दिसला होता. 9/11 हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ल्अल-कायदा’ने जारी केलेल्या व्हिडीओत तो दिसला होता.
याच वर्षी जून महिन्यामध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांच्या अहवालामध्ये “अल कायदा’च्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमा भागाजवळीच हालचालींमध्ये वाढ झाल्याचे म्हटले होते. तसेच या ठिकाणी या दहशतवादी संघटनेचे प्रमुख नेते असल्याचेही सांगितले होते. यामध्ये जवाहिरीचाही समावेश आहे. मात्र जवाहिरी जिंवत आहे की नाही याबद्दल शंका आहे.
दरम्यान, 11 सप्टेंबर 2001 रोजी ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखाली “अल-कायदा’ने अमेरिकेवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन मोठ्या इमारती त्यांनी उद्ध्वस्त केल्या होता.
या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने आपल्या लष्करासहीत अफगाणिस्तानवरील तालिबानच्या तळांवर हल्ला करत पहिल्यांदा अफगाणिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार होते. अमेरिकने त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर घडवून आले. हा संघर्ष 20 वर्षे चालला, अखेर अमेरिकने मागील महिन्यात आपले संपूर्ण सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घेत असल्याची घोषणा केली.