नवी दिल्ली – येमेनमध्ये कार्यरत असलेल्या अल कायदाशी संबंधित गटाचा म्होरक्या खालिद-अल-बतार्फी येमेनमध्ये ठार झाल्याची माहिती मिळते आहे. दहशतवादी गटाकडून रविवारी ही माहिती जाहीर करण्यात आली.
अल-कायदा इन अरेबियन पेनिनसुला या गटाशी संबंधित असलेल्या खालिद-अल-बतार्फी याच्यावर अमेरिकेकडून ५० लाख डॉलरचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. अल-कायदाशी संबंधित ही दहशतवादी संघटना कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा झाल्यानंतरही अत्यंत घातक दहशतवादी संघटना म्हणून समजली जाते.
बतार्फी याच्या दफनविधीचा एक व्हिडीओ अल-कायदाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बतार्फीचा मृतदेह अल-कायदाच्या काळ्या-पांढऱ्या झेंड्यात गुंडाळला होता. त्याला कोणतीही इजा झाल्याची चिन्हे या व्हिडीओमध्ये आढळली नाहीत. तसेच ४० वर्षीय बतार्फीचा मृत्यू नक्की कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत कोणताच उलगडा करण्यात आला नाही.
बतार्फी २०२० मध्ये कासिम अल रिमीचा उत्तराधिकारी म्हणून अल-कायदाचा प्रमुख बनला होता. आता त्याच्या जागेवर ३६ वर्षीय साद बिन अतेफ अल-अवलाकी याच्याकडे संघटनेचे नेतृत्व सोपवले जाणार आहे, असे अल-कायदाने म्हटले आहे. अमेरिकेने त्याच्यावर देखील ६० लाख डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे.