मुंबई – प्रताप सरनाईकांपाठोपाठ संजय राऊतांना ईडीची नोटीस आल्याने शिवसेना आता आक्रमक झाली आहे. ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पाच जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचे कळते आहे.
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बस, कारने शिवसैनिक दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रताप सरनाईकांसह त्यांच्या दोन्ही मुलांना आणि संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवला होता. भाजपचे हे षडयंत्र असून सरकार पाडण्यासाठी ते डाव खेळत आहेत, असा आरोप शिवसेनेने याआधी केला होता. तसेच ईडी कार्यालयाबाहेर ‘भाजप कार्यालय’ असे बॅनरही लावण्यात आले होते.
ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र, तसे आम्ही होऊ देणार नाही. ईडी चौकशीला आम्ही घाबरत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.