पुणे – गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या शिवाजीनगर येथील “विशेष’ लाईनचे काम थंडावले आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेले हे काम ऑगस्ट उजाडला तरी “ट्रॅकवर’ आले नाही.
शिवाजीनगर रेल्वे स्थानकामध्ये 15 डब्यांची लोकल उभी करता यावी, यासाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूला विशेष मार्ग तयार करण्यात येत आहे. अडीच कोटी रुपयांचा खर्च असणाऱ्या या प्रकल्पाचे काम गेल्या 5 महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे या जागेवर पावसामुळे राडारोडा झाला आहे. यामुळे अस्वच्छता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे डास आणि माशांची समस्या वाढत आहे.
पुणे स्थानकातून शिवाजीनगरमार्गे शेकडो गाड्या धावतात. यासह पुणे ते लोणावळा धावणाऱ्या लोकलदेखील यामार्गे धावतात. लाखो प्रवाशांच्या रोजचा मार्ग असणाऱ्या शिवाजीनगर स्थानकामध्ये अनेकदा गाड्या उभ्या करताना प्रशासनाला अनेक अडचणी येतात. या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने प्लॅटफॉर्मच्या शेजारी नवा ट्रॅक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या ट्रॅकसाठी आवश्यक असणारे साहित्य या परिसरात पडून आहे. मात्र एक ना अनेक कारणांमुळे सध्या हे काम धिम्या गतीने सुरू आहे.
तांत्रिक अडचणींचे कारण
ऑक्टोबर 2019 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. संततधार पाऊस आणि तांत्रिक कारणांमुळे या कामात अडथळे येत आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.