खायचे वांदे अन् थाट बाजीरावाचा; शिवसेनेची पाकिस्तानवर टीका

मुंबई – आधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना हातात कटोरा घेऊन पुनः पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून अमेरिका आणि चीनच्या दारात जावे लागत आहे. इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानात आर्थिक अराजक पसरले आहे. इम्रान खान यातून मार्ग काढतीलही, पण खिशात आणा नसताना बाजीराव बनण्याचे सोंग पाकिस्तानने का करावे? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

खायला नाही दाणा अन्‌ मला बाजीराव म्हणा अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. भारतासाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानातील घटना, घडामोडींकडे कितीही डोळेझाक करायची म्हटली तरी दाराजवळचा शेजार म्हणून पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या आणि तेथील बऱ्यावाईट गोष्टींकडे नजर ठेवावीच लागते. कमालीचे दारिद्रय, भुकेकंगाल जनता, महागाईचा आगडोंब, कर्जात आकंठ बुडालेला देश आणि जर्जर झालेली अर्थव्यवस्था हे पाकिस्तानचे वास्तवदर्शी रूप आहे. मात्र तरीही आम्ही अण्वस्त्रसज्ज देश आहोत असा तोरा हा देश कायम मिरवत असतो. पाकिस्तानचा हा दिमाख बेगडी आहे हे आता जगापासून लपून राहिलेले नाही, असेही पक्षाच्या मुखपत्राच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

पाकिस्तानातून येणाऱ्या ताज्या बातमीने तर अब्रूची उरलीसुरली लक्तरेही वेशीवर टांगली गेली आहेत. पाकिस्तानची तिजोरी तर रिकामी आहेच, पण आता धान्याचे कोठारही जवळपास रिकामे झाले आहे. पाकिस्तानात अन्नामध्ये गव्हाचा वापर मोठया प्रमाणावर होतो. मात्र पाकिस्तानच्या विविध प्रांतांतील गव्हाचे साठे संपुष्टात आले आहेत. जेमतेम तीन आठवडे पुरेल एवढाच गहू निवडक गोदामांमध्ये शिल्लक आहे. तीन आठवडयांनंतर खायचे काय, असा गंभीर प्रश्न पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारपुढे निर्माण झाला आहे, असेही यात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.