उजनीचे पाणी इंदापूरला पळवल्यास जनआंदोलन; सुभाष देशमुख यांचा इशारा

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जर उजनीचे पाणी इंदापूरला पळवण्याचा प्रयत्न केला तर जे पक्ष, नेते येथील त्यांच्यासोबत किंवा नागरिकांना घेऊन आपण स्वतः जनआंदोलन उभारू आणि आगामी अधिवेशानात याबाबत आवाज उठवू, असा इशारा आमदार व माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूरचे पाणी नेणार नाही, असा शब्द पालकमंत्र्यांनी दिला आहे. त्यांनी तो शब्द पाळवा. उजनीच्या पाण्यासाठी पुणे आणि सोलापूर अशी लढाई करण्याचा प्रश्न नाही. ज्याच्या त्याच्या हक्काचे पाणी त्याला मिळाले पाहिजे. सत्तेचा कोणीही दुरूपयोग करू नये. सत्ता जात-येत असते. भरणे हे इंदापूरचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी इंदापूरसाठी नक्की झटावे. मात्र त्यांच्याकडे सोलापूरचे पालकत्व दिले. सोलापूरचे पाणी हिसकावून नेणे त्यांना न शोभणारे आहे. त्यांनी पळवण्याचा प्रयत्न केला तर आपण गप्प बसणार नाही. जनआंदोलन उभारू, अधिवेशनात आवाज उठवू मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांना उजनीचे पाणी इंदापूरला नेऊ देणार नाही, असे आमदार देशमुख म्हणाले.

दक्षिणच्या गावांसाठी सीना नदीत पाणी सोडावे
सध्या उजनीचे पाणी भीमा सीना जोड कालव्यातून सीना नदीत सोडले आहे. हे पाणी तिर्हे बंधाऱ्यापर्यंत आले आहे. मात्र दोन- तीन आठवडे झाले हे पाणी अजून दक्षिण तालुक्‍यातील गावाला मिळालेले नाही. येथील अधिकाऱ्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी या लक्ष घालून पाणी दक्षिणच्या गावांना सोडावे, येथील अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.