पुणे – पुण्यात आघाडीत कसबा विधानसभेच्या जागेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भूमिकेने राजकीय चर्चांना उधाण आलेले असतानाच आता महायुतीत असलेली शिवसेनाही पुण्यात नाराज झाली आहे.
भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत थेट पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त करताना, आमच्यासोबत असलेला मित्रपक्ष आम्हाला सोडून गेला आहे, तर सोबत असलेल्या शिवसेनेची पुण्यात काय ताकद आहे, असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद उमटले असून, शिवसेनेचे कार्यकर्ते, तसेच पदाधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांकडे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
महायुतीचे काम करत असताना अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत, अशी मागणीही केली असून, याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करण्याची मागणी शहरातून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर पुण्यात शिवसेना महायुतीसोबत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या सोबत आहेत.
हे दोन्ही गट शहरात आमनेसामने आले असून, त्यांच्याही कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू आहे. त्याचबरोबर आक्रमकपणे प्रचार केला जात आहे. मात्र, आता भाजपच्या या नेत्याकडून थेट पुण्यातील शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भाजप उमेदवाराचीच अडचण वाढण्याची चिन्हे आहेत.