नगर -उपनेते अनिल राठोड यांच्या अकाली निधनामुळे नगरमधील शिवसेनेचे मोठेच नुकसान झाले. शिवसेनेचे एक ढाण्या वाघ त्यांच्या रुपाने नगरमध्ये गमावला, अशी भावना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
मंत्री पाटील यांनी काल दिवंगत उपनेते अनिल राठोड यांच्या स्मृतींचा उजाळा दिला.
चितळेरोडवरील शिवालयात त्यांनी राठोड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर राठोड यांच्या पत्ती शशिकला ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तेथे जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. डॉक्टरांशी चर्चा करुन उपचारांत कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शिवसेना शहरप्रमुख दिलीप सापपुते, ज्येष्ठ नगरसेवक बाळसाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलासौंदर, गिरीश जाधव, परेश लोखंडे, मनीष गुगळे, विशाल वालकर, यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
राठोड यांच्याविषयीच्या अनेक आठवणी यावेळी पाटील यांनी सांगितल्या. दोघांनाही एकाचवेळी शिवसेना उपनेतेपद बहाल करण्यात आले. एकत्रच आमदार होते. निवासस्थान देखील एकाच मजल्यावर होते, अशा विविध आठवणी पाटील यांनी सांगितल्या. एक सच्चा मित्र गमावल्याचे दु:ख कायम राहील, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मी भगव्याच्या धुंदीत; गद्दारांच्या यादीत नाही..!
शिवसेना व दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी कडवा शिवसैनिक आहे. मी कायमच शुद्धीत असतो, तसाच मी कायमच भगव्याच्या धुंदीत असतो. मी गद्दारांच्या यादीत नक्कीच नाही, असा टोला मंत्री पाटील यांनी भाजप नेते नारायण राणे यांना लगावला. मी कोणाच्या धमकीला भीत नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली.
प्रशासनाची खरडपट्टी…!
अंत्यसंस्कारापूर्वी एकावर एक मृतदेह रचून ठेवलेल्या प्रकाराची मंत्री पाटील यांनी गंभीर दखल घेतली. या संदर्भात त्यांनी प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी देखील काढली. तातडीने नव्या शववाहिका खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी उपस्थित केलेल्या या मुद्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्र्यांना देखील देणार असल्याचे ते म्हणाले.