निधीचा वाटा प्रत्येक प्रभागाला मिळण्याबाबतची मागणी; तीन तासाची सभा तीनवेळा तहकूब
इस्लामपूर – मुख्यमंत्री आमच्याचं पक्षाचा असताना शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात निधी दिला जात नाही, असे म्हणत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. हा कोणाचा वैयक्तिक निधी नाही शासनाचा आहे. सर्व प्रभागांना समान वाटप करा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पाच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
यातील विकास कामांना मंजूरी देण्याच्या विषयावर तब्बल तीन तास चाललेली सभा तीनवेळा तहकूब झाली. अखेर नगराध्यक्षांनी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सहसचिवांच्या सहीने आलेल्या पत्रातील विविध कामांच्या यादीला मंजूरी दिली. ही सर्व कामे शहरातील वेगवेगळ्या अकरा प्रभागातील आहेत. उर्वरित प्रभाग क्रमांक एक, तीन, नऊ व दहा या चार प्रभागांना प्रत्येकी तीस लाख रुपये अतिरिक्त निधी देण्याची विनंती उपमुख्यमंत्री कार्यालयाला करण्याचे ठरले. विकास कामांसाठी आम्ही कधीही राजकारण करीत नाही, अशी भूमिका नगराध्यक्ष पाटील यांनी मांडली.
मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. या विशेष सभेच्या सभेत सादर करण्यात आलेल्या विकासकामांच्या यादीला शिवसेना नगरसेवक शकील सय्यद यांनी हरकत घेतली. आमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. अन् शिवसेनेचे नगरसेवक असणाऱ्या प्रभागातील कामे पाच कोटी रुपयांच्या निधीत नाहीत, असे म्हणत हरकत घेतली. ही हरकत अखेर फेटाळली.
आजच्या विशेष सभेबाबत धोरणात्मक निर्णय घ्या. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पाच कोटींचा निधी येत आहे. या कामांना मंजूरी देत शासनाकडून आलेला निधी खर्ची टाका. उर्वरित प्रभागासाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करून निधी आणू अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतली. राज्य सरकार कडून आलेली निधीबाबत उपमुख्यमंत्री यांचे पत्र आहे. हा शासनाचा जीआर नाही. पैसा शासनाचा आहे समान वाटप करा, अशी मागणी नगरसेवक
वैभव पवार व अमित ओसवाल यांनी केली.
स्थानिक आमदार आणि जलसंपदामंत्री यांच्या पाठपुराव्यामुळे पाच कोटी रुपयांचा निधी इस्लामपूर नगरपालिकेला मिळाला आहे. त्यांच्या भावनांचा विचार करायला हवा. जयंत पाटील यांनी नगरपालिकेतील विविध प्रभागातील कामांची यादी अर्थमंत्री अजित पवार यांना पाठवली आहे. यातील कामे प्राधान्यक्रमाने व्हावी, अशी मागणी शहाजी पाटील यांनी केली. याला विकास आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केला. नगरसेवक विक्रम पाटील, आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, विश्वास डांगे यांनी चर्चेत भाग घेतला. तर शिवसेनेचे नगरसेवक प्रदिप लोहार, प्रतिभा शिंदे, सीमा पवार व शकील सय्यद यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
त्यांनी सभागृह सोडले…!
विकास कामांच्या यादीवर आजची सभा चांगलीच गाजली. मंत्री महोदयांनी पाच कोटींचा निधी आणला खरा पण त्याचे सर्वांना समान वाटप करा.. आमच्या प्रभागातील कामे का नाहीत? ही यादी कोणी बनवली ? अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या नगरसेवक अमित ओसवाल, वैभव पवार यांनी नगराध्यक्ष पाटील यांच्या बदलत्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत सभागृह सोडले.
राष्ट्रवादी नगरसेवकांनी प्रलंबित निधी आणावा
नगरपालिकेत सत्ताधारी व विरोधात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या मंत्री महोदयांकडून पाठपुरावा करून शासनाकडून इस्लामपूर पालिकेचा प्रलंबित असणारा बावीस कोटींचा निधी आणावा असा सल्ला नगराध्यक्ष पाटील यांनी नगरसेवकांना दिला.