शिवसेनेच्या दणक्‍याने शिरूर “राष्ट्रवादी’त पडझड

जिल्हा परिषद सदस्य कटके यांच्या प्रयत्नांतून राजकीय उलथापालथ

शिवाजीराव आढळराव पाटलांचे लक्ष…

लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षाकडून सन्मानजनक उपनेते पद देण्यात आले. यानुसार आढळराव यांनी घरचा मतदारसंघ असलेल्या शिरूरवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. शिरूर विधानसभा काबीज करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून निर्णयात्मक पावले उचलली जात आहेत. यातूनच जिल्हा परिषद सदस्य कटके यांच्या माध्यमातून शिवसेना विजयश्री खेचून आणण्याचा विश्‍वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. शिरूरची व्यूवहरचना आखण्यात पाटील कमालीचे सक्रीय झाले आहेत.

पुणे  – जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी आणि त्यानंतर कॉंग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज आणि मुलाखतींचा कार्यक्रम आटोपला असतानाच आघाडी-बिघाडी पूर्वीच शिरूर-हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला आहे. या मतदारसंघातील अनेक मातब्बर घड्याळ काढून शिवबंधन बांधणार आहेत. शिरूर आणि हवेलीतील गट आणि गणांतील अनेक दिग्गजांना भगव्याखाली आणून राष्ट्रवादीला भगदाड पाडण्यात शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर (माऊली) कटके यांना यश आले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रातही पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री करण्याचे डोहाळे लागल्याने शिवसेनेने याला फारकत घेत विधानसभा स्वतंत्रपणे लढण्याची डरकाळी फोडली. तर, भाजप आणि शिवसेनेला रोखण्याकरीता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही आघाडीऐवजी स्वतंत्रपणे लढण्याचे धोरण आखले गेले. यातून राष्ट्रवादी आणि त्यानंतर कॉंग्रेसकडून इच्छुकांचे अर्ज, मुलाखतींचा कार्यक्रम सुरू असताना शिरूर-हवेली मतदार संघावर शिवसेनेने दावा केला. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुखांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिरूरमधील राजकारण फिरले आहे.

शिरूर-हवेलीवर एकेकाळी राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. परंतु, गेल्या पंचवार्षीकला भाजपचा आमदार निवडून आल्यानंतर या मतदारसंघावर भाजप वर्चस्व प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, वेगवेगळ्या मुद्यांवर भाजपला हे साध्य करता आलेले नाही. यातून या मतदारसंघात भाजपचे जनमत गेल्या पाच वर्षात घसरल्याचा दावा केला जात आहे. यामुळेच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपला उमेदवार निवडून आणणे सोपे गेले. तर, शिवसेनेला भाजपची साथ मिळाली नसल्याने लोकसभेला शिवसेनेच्या मतांत काहीशी घट झाली. लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याकरिता शिवसेना आता सरसावली आहे.

भाजपचे जनमत घसरल्याने शिरूर-हवेलीत पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा फायदा होऊ नये, याकरीता शिवसेनेकडून विधानसभा लढण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिरूर-हवेली मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्या, असा आदेश पक्षपातळीवरूनच सुटल्याने शिवसैनिकांनाही बळ मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीकरीता शिवसेनेकडून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर (माऊली) कटके प्रबळ दावेदार मानले जात आहेत. केवळ शिवसेनाच नव्हे तर अन्य पक्षांतही त्यांचा मोठा संपर्क आहे.

यासह स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी फौज आणि नाते संपर्क ही त्यांची बलस्थाने मानली जात आहेत. याच कारणातून विधानसभेकरिता ते आव्हान देणारे उमेदवार असतील, असा दावा केला जात आहे. शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने कटके यांच्याकडील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा ओघही वाढतो आहे. शिरूर-हवेली विधानसभेला अडचणीच्या ठरू शकणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच खिंडार पाडण्याची कटके यांची राजकीय खेळी यशस्वी ठरली असल्याचे मानले जात आहे.

शिरूर-हवेली विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. याकरीता मोठा पाठींबा मिळत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील असंख्य कार्यकर्ते शुक्रवारी (दि.2 ऑगस्ट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. यामुळे या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखी वाढण्यास मदत होणार आहे.

– ज्ञानेश्‍वर कटके, जिल्हा परिषद सदस्य, वाघोली-आव्हाळवाडी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.