शिरूर – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजार आवारात भरणारा शेतकरी बाजार बुधवारी (दि. 29) पहाटे तीन वाजल्यापासून भरविण्यात येणार आहे तर पिंपळे जगताप येथील तरकारी व भाजीपाला बाजार सोमवारी (दि. 3) ऑगस्टपासून सुरू होणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांनी दिली.
शिरूर शहरासह तालुक्यात वाढता करोनाचा प्रादुर्भाव यामुळे शहर गेल्या दहा दिवसांपासून पूर्णपणे लॉकडाऊन होते. त्यामुळे बाजार समिती 10 दिवस बंद ठेवण्यात आली होती. हे लॉकडाऊन संपत असल्याने बाजार पुन्हा सुरू होणार आहे. तर पिंपळे जगताप येथील भाजीपाला मार्केटमधील आडतदार व शेतकरी करोनाग्रस्त आढळले होते. त्यामुळे पिंपळे जगताप येथील उपबाजार बंद ठेवण्यात आला होता.
आता प्रतिबंध क्षेत्र केल्याचे दिवस संपले असल्याने हाही बाजार 3 ऑगस्टपासून पूर्ववत सुरू होत असल्याचे सभापती जांभळकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला व तरकारी मार्केट यार्डवरच विक्री करावा, असे आवाहन उपसभापती विकास शिवले यांनी केले आहे.
शिरूर व पिंपळे जगताप येथील अनुक्रमे शेतकरी बाजार व आडत बाजार सुरू होत आहे. तरी शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, हमाल, माथाडी यांनी तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या सर्व शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन सचिव अनिल ढोकले यांनी केले आहे.