शिर्डीत प्रचाराची रणधुमाळी थांबली

फोडाफोडी, पाठिंब्याच्या राजकारणाला आला वेगसर्वच उमेदवारांनी दिला रॅली, प्रचार पदयात्रांवर भर

नगर  –
शिर्डी लोकसभा मतदारसंघात पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी थांबली असून, उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरणाऱ्या भोंग्यांचा आवाज बंद झाला आहे. आता गुफ्तगू आणि फोडाफोडीच्या राजकारणासह अनेकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी रविवारी दिवसभर धावपळ सुरू असणार आहे. लोकसभा निवडणूक प्रचार शनिवारी सायंकाळी 5 वाजता संपला. शेवटच्या दिवशी पूर्ण शक्तिप्रदर्शनाने सर्वच उमेदवारांनी वाहन रॅली, प्रचार पदयात्रांवर भर देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीच्या मैदानात 20 उमेदवार आहेत. यामध्ये शिवसेना- भाजप महायुती, कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी, अपक्ष, वंचित बहुजन आघाडी उमेदवारांचा समावेश आहे. तिरंगी लढतीमुळे मैदान कोण मारणार, हे अस्पष्ट आहे. कडक उन्हाळ्यात निवडणुका असल्यामुळे सर्वच उमेदवारांचा प्रचार करताना घाम निघाला. 11 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर लोकसभा मैदानाचे चित्र स्पष्ट झाले. 20 उमेदवार मैदानात राहिले. पदयात्रा, रिक्षा, सभा, कॉर्नर बैठका घेऊन मागील पंधरा दिवस पूर्ण मतदारसंघात रणधुमाळी सुरू राहिली. जिल्हा प्रशासनाने एक खिडकी’तून वाहन रॅली, प्रचार सभांसह प्रचार वाहनांना परवानगी दिली. शनिवारी सायंकाळी 5 वाजता प्रचार तोफा थंडावल्यानंतर सर्व पक्ष-अपक्ष उमेदवारांनी प्रचार वाहनांचा आढावा घेत त्यावरील भोंगे, स्पीकर्स, बॅनर्स, झेंडे काढून घेतले की नाहीत, याचा आढावा घेतला.

स्टार प्रचारकांच्या सभांचा बोलबाला या वेळच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचाराकांच्या सभा झाल्या. शिवसेनेच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या. कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, वंचित आघाडीसाठी डॉ. प्रकाश आंबेडकर आदींच्या सभा झाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.