राजेंद्र मोहिते
कराड – कराड नगरपालिकेतील यशवंत आघाडीचे गटनेते माजी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी काही दिवसांपूर्वीच जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. तर पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक व राजेंद्रसिंह यादव यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी बाबा गटातील अंतर्गत गटबाजीवर नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाशी जवळीक साधली आहे. यावर शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी इंद्रजित गुजर यांची भेट घेतल्यानंतर जवळपास शिक्कमोर्तब झाले आहे. त्यामूळे आता अगदी तोंडावर असलेल्या कराड पालिका निवडणुकीतही शिंदे-ठाकरे गटाची टशन पहायला मिळणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
राज्यात शिवसेनेमध्ये फुट पडून शिंदे व ठाकरे असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. त्यानंतर या दोन्ही गटात राज्यभरातून विविध स्तरावर जोरदार राजकीय इनकमिंग व आउटगोइंग सुरू आहे. त्यानुसार कराड शहरात आगामी नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने एक-दोन महिन्यांच्या अंतरावर स्थानिक नगरसेवकांनी शिंदे व ठाकरे गटाच्या नेत्यांशी जवळीक साधल्याने नागरिकांमध्ये अनेकविध तर्कवितर्कांना उधाण झाले आहे.
खा. उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेल्या नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी जाहीरपणे शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, त्यांनी नुकतीच उदयनराजे भोसले यांचे जंगी स्वागत करून बैलगाडीतून मिरवणूकही काढली. त्यामुळे पक्षप्रवेश ही केवळ एकप्रकारची पालिका निवडणुकीपुरती स्थानिक भाजप नेते व पदाधिकाऱ्यांसह पृथ्वीराज बाबा गटालाही चेक देण्याची खेळी असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, गत पालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक इंद्रजीत गुजर यांनी बाबा गटाशी जवळीक साधली. परंतु, नुकत्याच झालेल्या कॉंग्रेस शहराध्यक्ष पदाच्या निवडीवेळी आपल्याला विचारात घेतले नसल्याच्या कारणावरून त्यांनी बाबा गटाशी दुरावा धरत ठाकरे गटाशी जवळीक साधली आहे. त्यामुळे ही जवळीकही पालिका निवडणुकीपुरती असून अंतर्गत सहमतीनुसारच इंग्रजीत गुजर यांनी प्रतिस्पर्धी म्हणून एकप्रकारे राजेंद्रसिंह यादव व शिंदे गटाला चेकमेट केल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकीत शिंदे गट व ठाकरे गट असा जोरदार सामना पाहायला मिळणार असून या सामन्याकडे कराडकर नागरिकांसह जिल्ह्यातील लोकांच्या नजरा लागल्या आहेत.
तसेच पालिकेतील लोकशाही आघाडीतील काही घटक शिंदे गट व त्यांच्या स्थानिक नेत्यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरु आहे. नुकतेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार कराडला आले असता त्यांच्या स्वागताला लोकशाही आघाडीतील नगरसेवक असल्याने त्याला दुजोरा मिळाला आहे. तर कराड शहरातील स्थानिक भाजप नेते व त्यांचे गट शिंदे समर्थक गटाला जुळवून घेणार का? याबाबतही शहरात सध्या उलटसुलट चर्चा असून नेमके चित्र पालिका निवडणुकीदरम्यानच स्पष्ट होणार आहे.
बाबा गटाला धक्का
एकीकडे, गत विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी आ. आनंदराव पाटील (नाना) यांनी बाबांशी फारकत घेतली. तसेच गत पालिका निवडणुकीतच पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील आघाडीतून निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. त्यात आता त्यांच्याशी जवळीक असलेले आणखी एक नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याने हा पृथ्वीराज बाबा गटासाठी धक्का असल्याचे बोलले जात आहे.
आमदार आणि भोसले गटाला उकळ्या
दुसरीकडे, माजी आ. आनंदराव पाटील, पृथ्वीराज बाबांच्या मार्गदर्शनाखालील आघाडीतून निवडून आलेले व सध्या शिंदे गटात प्रवेश केलेले काही नगरसेवक आणि त्यातच आता ठाकरे गटाशी जवळीक साधलेले नगरसेवक यांच्यामुळे शहरातील बाबा गटाची ताकद काहीशी कमी झाली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जवळीक साधलेल्या आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या गटाला मात्र उकळ्या फुटल्या असल्याची चर्चाही सध्या शहरात सुरु आहे.