कराड -ऑक्सफर्ड हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ असून तेथे प्रशिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेतील काही निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत. तेथील आय.बी.एम. ही कंपनी जगातील 117 देशात काम करते. लवकरच हा कोर्स कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात सुरु करणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशात जावून शिक्षण घेण्यापेक्षा कराडमध्ये शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय दालन उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी केले.
येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात रविवार दि. 5 रोजी सकाळी रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या शताब्दी इमारतीचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, माजी आ. शशिकांत शिंदे, माजी आ. प्रभाकर देशमुख, संस्थेचे व्हा. चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे, ऍड. रवींद्र पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. शरद पवार म्हणाले, कर्मवीर अण्णांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केल्याने आज महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला. अण्णांनी बॅरिस्टर पी. जी. पाटील यांना खांद्यावरून साताऱ्याला आणले.
उच्च शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडलला पाठवले. बॅरिस्टर होऊन परत आल्यानंतर त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी नाकारून संस्थेची सेवा केली. पुढे शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरू, एम.पी.एसी.च्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यांच्या पत्नी सुमतीबाई पाटील यादेखील सुशील, हुशार होत्या. त्यांची देखील निवड एम.पी.एसी.च्या अध्यक्षपदी निवड झाली. कर्तुत्व पाहून संधी दिली, की काय होते; याचे हे उत्तम उदाहरण आहे. आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात फिरताना अधिकाऱ्यांची माहिती घेतल्यानंतर तो रयतचा विद्यार्थी असल्याचे सांगतो. याचा मला अभिमान आणि आनंद यासाठी वाटतो की, आज परदेशातील काही मुले या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. काळ किती झपाट्याने बदलतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ऍड. रवींद्र पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हे महाविद्यालय काळाची आव्हाने पेलण्यास सक्षम आहे. अधाय्क्षा साहेबांनी फक्त आदेश द्यावा. अंमलबजावणी आम्ही करतो, असे सांगितले. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, सूत्रसंचालन प्रा. डॉ. कोमल कुंदप, व प्रा. डॉ. प्राजक्ता निकम, प्राचार्या डॉ. जे. डी. शिर्के मॅंडम यांनी आभार मानले.