नागपूर – विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या जोरात सुरु आहे. अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी तर राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हे चालवत असून मुख्यमंत्री केवळ नामधारी असल्याची टीका देखील वारंवार केल्याचे पाहायला मिळते. त्यातच आता नागपुरात विधानभवनाबाहेर लागलेल्या फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेच्या कटआऊटवरून जोरदार चहरचा सुरु झाली आहे.
बुधवारी रात्री विधानभवनाबाहेर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कटआऊट पाहायला मिळाले. परंतु यात मुख्यमंत्री शिंदे यांचे छोटे तर फडणवीस यांचे कटआऊट मोठे असल्यामुळे याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. कोणी खोडसाळपणा करण्यासाठी हे कटआऊट लावले की खरंच शक्तिप्रदर्शन करण्यासाठी फडणवीस समर्थकांनी हे केलं ? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
उत्तरार्धातील बोलके चित्र #हिवाळीअधिवेशन pic.twitter.com/bgRhjJNyGb
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 28, 2022
मात्र या कटआऊटवरून जोरदार चर्चा सुरु झाल्यानंतर फडणवीस यांचे कटआऊट आहे तसेच ठेऊन एकनाथ शिंदे यांचे कटआऊट एका बोर्डवर ठेऊन ते मोठे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कटआऊटवरून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी ही शक्कल लढवल्याचे देखील बोलले जात आहे. यापूर्वी देखील फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदेकडून माईक घेतल्यानंतर विरोधकांनी जोरदार टोलेबाजी केली होती. आता या कटआऊट प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटणार का हे महत्वाचं असेल.