अतिक्रमण निर्मूलन विभागाची कारवाई
पुणे – करोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने शहरातील मध्यवर्ती भाग सील करण्यात आला आहे. या भागातील सर्व भाजीमंडईदेखील बंद आहेत. असे असतानाही शुक्रवार पेठेतील शिंदे आळी परिसरात मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान भाजी मंडई भरत आहे. तसेच सकाळीही या भागात मोठ्या प्रमाणात भाजी विक्री केली जात असल्याने सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात आहे. ही बाब समोर येताच महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी सकाळी या परिसरातील भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.
तसेच या ठिकाणी रात्री भाजी विक्री होत असल्याने रात्रीही महापालिकेचे पथक पोलिसांच्या मदतीने या भागात अतिक्रमण कारवाई करणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
लॉकडाऊन काळात शहरात अत्यावश्यक सेवांची दुकानेही काही ठराविक वेळच सुरू असून गर्दी होणाऱ्या भाजी मंडई तसेच इतर ठिकाणेही सील करण्यात आली आहेत. मात्र, त्यानंतरही शिंदे आळी परिसरात भाजी मंडई सुरू होती. या मंडईवर पालिका कारवाई करत असल्याने आता रात्रीच्या वेळी ही मंडई भरविली जात होती.