कलेच्या माध्यमातून विविध विक्रमांची नोंद; कलाकृतीतून सामाजिक संदेश
उमेश सुतार
कराड – व्यक्तीकडे जिद्द, चिकाटी आणि योग्य मेहनत असेल तर काहीही करू शकतो. खरंतर गावाकडून मुंबईच्या धकाधकीच्या दुनियेत जाणे म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठीच. पण यावर मात करून पण आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे अनेकजण असतात. अशातीलच एक युवक म्हणजे कराड तालुक्यातील शेवाळवाडी (येवती) येथील सर्वसामान्य कुटुंबातील आबासाहेब शेवाळे. मूळगाव कराड तालुक्यातील शेवाळवाडी (येवती) असलेला आबासाहेब शेवाळे हे सध्या नवीमुंबई वाशी येथे राहतात. आपल्या अंगभूत कलेच्या माध्यमातून या युवकाने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यांच्या या विविध विक्रमांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया ऑफ रेकॉर्ड यामध्ये झाली आहे. केवळ कलाकृती न करता त्या कलाकृतीतून काही तरी सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो.
आबासाहेब शेवाळे यांचे प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण आर. एफ. नाईक हायस्कूल मध्ये पूर्ण झाले. शिक्षण घेतानाच त्यांना कलेची आवड निर्माण झाली. त्यामुळे 12 वी नंतर त्यांनी ठाणे येथे स्कूल ऑफ फाईन आर्ट मध्ये ऍडमिशन घेतली. पण त्याचवेळी अचानक वडील वारल्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि त्यांनी तो कोर्स अर्ध्यातच सोडला. त्यानंतर चरितार्थासाठी आर्टीकल्स् क्षेत्राच्या प्लास्टिक मॉडेल मध्ये 3 वर्षे जॉब केला. त्यानंतर पार्ट टाईम ऍनिमेशनचा डिप्लोमा पूर्ण केला आणि सध्या ते 9 वर्षे झाले थ्रीडी ऍनिमेशनमध्ये काम करीत आहेत. नोकरी करुन फावल्या वेळेत तो या कलाकृती करत असतो.
पेन्सिलस्केच, मोझॅक आर्ट वर्क करत असताना पिनांच्या साह्याने ऍनामॉटिफीक आर्ट, वॉटर कलर पेंटींग, डिजीटल आर्टवर्क, दिव्यापासून कलाकृती, कागदी पिशव्यांपासून कलाकृती त्यांनी तयार केलेल्या आहेत. आतापर्यंत सुप्रसिध्द व्यक्तींसाठी 65 पुश-पिनमोझेक कलाकृती पूर्ण केल्या आहेत. ते सर्वाधिक पोर्ट्रेटस ऑफ पुश-पिनसाठी राष्ट्रीय रेकॉर्डधारक आहेत. त्यांनी प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वासाठी विविध पेन्सिल पोट्रेट देखील तयार केले आहेत.
दिल्लीतील आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियरलीग 2015 मध्ये आपले काम प्रदर्शित केले आहे. सध्या थ्रीडी आर्टवर्कमध्ये काम करत आहेत. आतापर्यंत शेवाळे यांनी विविध मान्यवरांना भेटी दिल्या आहेत. त्यापैकी महेंद्रसिंग धोनी, अमिताभ बच्चन, गौतम गंभीर, केदार जाधव या दिग्गजांच्या भेटींचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांना विविध ठिकाणचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच विविध ठिकाणी वैयक्तिक तसेच ग्रुप प्रदर्शने भरवून त्यांनी आपली कला लोकांसमोर मांडली आहे.
12 बाय 18 फूट आकाराची सर्वात मोठी पेपर पिशवी मधून छत्रपती शिवाजी महाराज यांची कलाकृती ज्याची नोंद युनिक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. 9.5 बाय 14 फूट आकारात विराट कोहलीची प्रतिमा दिव्यांच्या माध्यमातून केली आहे. 24 बाय 46 फूट आकारात टेलरींग मटेरियलच्या माध्यमातून सचिन तेंडूलकर यांची प्रतिमा साकारली आहे.
धोनीला कलाकृती देण्याचे स्वप्न पूर्ण
सर्वप्रथम महेंद्रसिंग धोनी यांना कलाकृती देण्याचा योग आला. त्यांनी या कलाकृतीचे कौतुक केले. धोनीला कलाकृती खूप आवडतात. त्यामुळे पिनांच्या साह्याने कला प्रकारानेही कलाकृती बनवली होती. ती कलाकृती पाहून तो खूप खूश झाला. आतापर्यंत त्याने वेगळी कलाकृती पाहिली नव्हती. सगळ्यात वेगळी कलाकृती असल्याचा दावा धोनीने केला. नोकरी सांभाळत आपले कलेवर प्रेम टिकवून ठेवले आहे. अजूनही कला क्षेत्रातील विविध कलाकृती साकारण्याचा मानस आहे.
आबासाहेब शेवाळे, शेवाळवाडी.