अजित पवारांच्या वाढदिनी शेखर ओव्हाळ यांचे शक्‍तिप्रदर्शन

आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला; धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव

तुमच्यासारखा भाषण करेन…
शेखर ओव्हाळ प्रास्ताविकासाठी उभे राहिले असता आपला इथपर्यंतचा जीवनप्रवास मांडताना काहीसे भावुक झाले. त्यांच्या मनमोकळ्या भाषणाने उपस्थित देखील भावुक झाले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांना धीर दिला. यानंतर ओव्हाळ म्हणाले, मी कधीच स्वार्थासाठी राजकारण केले नाही, मला जनतेची सेवा करायची आहे. यामुळे मी उभा आहे, भविष्यात मला संधी मिळाल्यास धनुभाऊसारखा मी ही जनतेच्या प्रश्‍नावर विधानसभेत आक्रमकपणे भाषण करेल. 

पिंपरी – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर जोरदार शक्‍तीप्रदर्शन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते शहराच्या जडण-घडणीत योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला. तसेच यावेळी ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला करण्यात आली.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास शरद पवार व अजित पवार यांच्या संकल्पनेतून झाल्याने पिंपरी-चिंचवड शहर आज जगाच्या पाठीवर हेवा वाटेल असे बनले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करून देखील निवडणुकांच्या वेळी मतांसाठी खाली बघण्याची वेळ आली ही दुर्देवाची बाब असल्याचे ते म्हणाले.

मराठवाड्यातील नागरिक रोजगारासाठी या शहरात येतात. शहरवासियांनी मराठवाड्याच्या लोकांना खरा आधार दिल्याने मी शेवटच्या श्‍वासापर्यंत पिंपरी-चिंचवडकरांचे उपकार विसरणार नाही, असेही मुंडे यांनी यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्यासह संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मोरेश्‍वर भोंडवे, नाना काटे, राजू मिसाळ, शमीम पठाण यांच्यासह राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)