अवघ्या 14 दिवसांत 84 लाख 12 हजारांची वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्के वाढले आगाराचे भारमान
शैलेश तारू व भाऊसाहेब रोडगे जोडीने विक्रम मोडला
शेवगाव बसस्थानकाचे रुपडे कधी बदलणार
शेवगाव (प्रतिनिधी) –शेवगाव आगाराच्या चालक वाहकांनी ऐन दिवाळीत चाकर नाम्याला घरी जाऊन आपल्या माणसांमध्ये सण साजरा करता यावा, लेकी बळींना आपल्या बंधू राजास औक्षण करण्यासाठी विनासायास पोहोचता यावे, यासाठी तसदी घेतली. आपल्या समाजबांधवांची दिवाळी गोड व्हावी, तसेच आपण ज्या संस्थेत काम करतो, तिच्या कर्तव्याचे भान जपले म्हणून दिलेल्या सेवेमुळे शेवगाव आगाराने जिल्ह्यात हंगामी दरवाढीत सर्वाधिक उत्पन्न मिळून आघाडी मिळविली आहे. तब्बल 84 लाख 12 हजार रुपये उत्पन्न मिळविले.
आगारप्रमुख वासुदेव देवराज, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अमोल फंड, स्थानक प्रमुख प्रवीण दिवाकर आणि आगारातील सर्वच चालक, वाहक, तंत्रज्ञ यांनी समन्वय साधत एकीच्या भावनेने काम केल्याने हे यश मिळविले. दि. 23 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या दिवाळी सणाच्या कालावधीत एसटी महामंडळाने दहा टक्के हंगामी दरवाढ केली होती. या काळात एसटीला उत्पन्न वाढीची मोठी संधी असल्याने ही दरवाढ करण्यात आली होती. या काळात एक लाख 86 हजार किलोमीटर गाड्या धावल्या असून तब्बल 84 लाख 12 हजाराचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे 65.79 टक्के भारमान पडले आहे. मागील वर्षीच्या भारमानापेक्षा ते 14.94 टक्क्यांनी वाढले आहे. यात येथील चालक, वाहकांनी 35 हजार किलोमीटर अधिक गाड्या धावून 14 लाख 10 हजार अधिक उत्पन्न मिळविले आहे.
या कालावधीत आगारातील सर्वच चालक, वाहक, तंत्रज्ञ यांनी समन्वयाने काम केले असून त्यात शैलेश तारू व भाऊसाहेब रोडगे या वाहक-चालक जोडीने 135 टक्के भारमान मिळवित नाशिक ट्रिपचे सर्वसाधारण वीस हजारापर्यंत येणारे उत्पन्नाचे मार्गावर बत्तीस हजार रुपये उत्पन्न आणले तर सचिन राजहंस व निलेश बनसोडे या जोडीने श्रीरामपूर शटल धावून 132 टक्के भारमान मिळवित सर्वसाधारण साडेसहा हजार रुपये उत्पन्न येणाऱ्या मार्गावर 12 हजार रुपये उत्पन्न आणले. ज्योती क्षिरसागर व किरण गुठे या वाहक – चालकानी 128 टक्के भारमान घेत नगर- पैठण या साधारणतः 7 हजार 500 रुपये उत्पन्न येणाऱ्या मार्गावर 16 हजार रुपये उत्पन्न घेतले आहे.
शेवगाव आगार हे जिल्ह्यातील सर्वात जुने आगार असून पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बहूतेक गाड्या याच मार्गे धावत असतात. त्यामुळे या स्थानकात रात्र न् दिवस वर्दळ असते. अगदी मंदीच्या काळात सुद्धा या आगाराचे उत्पन्न दिवसाकाठी किमान पाच लाखाच्या पुढे असते. हे जिल्ह्यात सर्वात जुने आगार असूनही येथे अद्याप अद्ययावत बसस्थानक नाही. यावर्षी आमदार मोनिकाताई राजळे यांनी त्यासाठी तीन कोटीचा निधी उपलब्ध केला असून अद्याप त्याचे काम सुरु झालेले नाही. परंतु लवकरच हे काम सुरू होणार असल्याने अद्ययावत व प्रशस्त असे बसस्थानक शेवगावमध्ये होण्याची अपेक्षा आहे.