चेन्नई, – जयललिता यांच्या अद्रमुक पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या शशिकला यांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून चार वर्षांच्या तुरुंगवासानंतर सुटका करण्यात आली आहे. शशिकला या जयललिता यांच्या अत्यंत निकटच्या सहकारी होत्या व त्यांना चिन्नमा म्हणूनही तमिळनाडूच्या राजकारणात ओळखले जाते.
दरम्यान, शशिकला यांच्या सुटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्यने गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत मिठाई वाटपही करण्यात आले. बंगळुरू येथील वैद्यकीय महाविद्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार आज सकाळी अकरा वाजता शशिकला यांना सोडण्यात आले.
करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 21 जानेवारी रोजी येथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सुटकेच्या संदर्भातील सर्व औपचारिकता आम्ही पूर्ण केल्या असून कायद्याच्या दृष्टिकोनातून शशिकला आता मुक्त झाल्या असल्याचे त्यांचे वकील राजा सेंथूर पंडियन यांनी सांगितले. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या आणखी काही दिवस इस्पितळात राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्ञात स्रोतापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. फेब्रुवारी 2017 पासून त्या तुरुंगातच होत्या.