चेन्नई – तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा चेन्नई येथील पोएस गार्डन येथील बंगला संपादित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला असून या बंगल्याच्या किमतीपोटी 67 कोटी 90 लाख रुपये इतकी रक्कम कोर्टात जमा केली आहे. या बंगल्यात जयललितांचे कायमस्वरूपी स्मारक करण्याचा राज्य सरकारचा इरादा आहे.
या एकूण रकमेपैकी 36 कोटी 90 लाख रुपये जयललितांच्या नावावर जी आयकर आणि संपत्ती कराची थकबाकी आहे त्या पोटी भरली जाणार आहे. त्यामुळे या बंगल्यावर आयकर विभागाची कोणतीही जप्तीची कारवाई होणार नाही. चेन्नईच्या अत्यंत महागड्या भागात हा बंगला असून तो जवळपास एक एकर जागेवर वसला आहे. त्या बंगल्यात जयललितांचे स्मारक करण्याची घोषणा पलानी स्वामी यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच केली होती.
या बंगल्याच्या संपादनासाठी आम्ही कोर्टात सुमारे 68 कोटी रुपये भरले असल्याची माहिती अद्रमुक पक्षाचे नेते व राज्यातील मच्छिमार विभागाचे मंत्री डी जयकुमार यांनी पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले की, आम्ही ही रक्कम कोर्टात भरली असल्याने आम्हाला आता या बंगल्याचे संपादन करण्याची अनुमती मिळू शकते. सरकारने भरलेल्या रकमेतून जयललितांच्या वारसांना नुकसानभरपाई कोर्टाकडून दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.