नवी दिल्ली – बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिल्याबद्दल दिल्लीच्या न्यायालयाने कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना आज पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. पंतप्रधानांना विंचवाची उपमा दिल्याबद्दल दिल्लीतील भाजपचे एक नेते राजीव बब्बर यांनी त्यांच्या विरोधात हा बदनामीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीला ते उपस्थित राहिलेले नाहीत.
मागच्या सुनावणीच्यावेळी कोर्टाने त्यांना आज उपस्थित राहण्याची सुचना केली होती, पण आजही ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. मी भगवान शिवाचा भक्त असून शशी थरूर यांनी शिवभक्तांचाहीं अवमान होईल असे वक्तव्य केले आहे आमच्या भावना त्यामुळे दुखावल्या आहेत असे बब्बर यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. मोदी हे शिवलिंगावर बसलेल्या विचंवासारखे आहेत असे एका संघ स्वयंसेवकानेच म्हटले होते असा दाखला थरूर यांनी एकेठिकाणी दिला होता. त्या अनुषंगाने त्यांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.