Share Market 10 April – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उच्चांकी पातळीवर असूनही देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबाबत कमालीचे उत्साही दिसत आहेत. अशा परिस्थितीत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स प्रथमच 75 हजार अंकाच्या पुढे गेला. कालच्या तुलनेत सेन्सेक्स आज 354 अंकांनी वाढून 75,038 अंकावर बंद झाला.
विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 111 अंकांनी म्हणजे 0.49 टक्क्यांनी वाढून 22,753 अंकावर बंद झाला. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक अपेक्षेपेक्षा जास्त वाढले आहेत. आता कंपन्यांचे बाजार मूल्य 400 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. अशा परिस्थितीत किरकोळ गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची आवश्यकता विश्लेषक व्यक्त करत आहेत.
दरम्यान अमेरिकेच्या पत धोरण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त लवकरच जाहीर होणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील किरकोळ किमतीवरील महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. या दोन्ही आकडेवारीकडे देशातील तसेच परदेशातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहेत. जर ही आकडेवारी व्याजदर कपातीसाठी पूरक असेल तर सध्याच्या पातळीवर निर्देशांक स्थिर राहतील असे समजले जाते.
आय टी सी, कोटक महिंद्रा बँक, एअरटेल, स्टेट बँक, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले या कंपन्यांनी आज तेजीचे नेतृत्व केले. तर मारुती, एचडीएफसी बँक, लार्सन अँड ट्यूबरो, महिंद्रा या कंपन्या पिछाडीवर होत्या. मोठ्या कंपन्याबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅप 0.89 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.43 टक्क्यांनी वाढला.
तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा, धातू, सेवा क्षेत्राचे निर्देशांक वाढले असल्याचे दिसून आले.
एकूण कंपन्यापैकी 1961 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर 1869 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. जागतिक बाजारात आज संमिश्र वातावरण होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 593 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली. याचा अर्थ परदेशी गुंतवणूकदारापेक्षा देशातील गुंतवणूकदार जास्त गुंतवणूक करीत असल्याचे दिसून येते. गुरुवारी धार्मिक कारणामुळे शेअर बाजाराचे कामकाज होणार नाही.