सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज होणारा सोलापूर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमुळे दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आज सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावर आहेत.
परंतु अचानक शरद पवार यांनी दौरा रद्द केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार आज माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे येणार असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेणार होते. यानंतर पंढरपूर येथे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत श्रेयस पॅलेस येथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीसाठी बैठक होणार होती. या बैठकीला शिवसेनेच्या नेत्यांनाही निमंत्रित केले होते. मात्र शरद पवार यांचे हे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहे.
दरम्यान, शरद पवार यांचा दौरा जरी रद्द झाला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात कोणताही बदल झालेला नाही. माढाचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या टेंभूर्णी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमासाठी अजित पवार येणार आहेत. मात्र मराठा आंदोलकांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे.