संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरूच आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे आज आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आले. अशा प्रकारे संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहे. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. या लोकसभेतील खासदारांच्या निलंबनाच्या या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एकीकडे विरोधी पक्षाच्या खासदारांकडून यासंदर्भात तीव्र निषेध केला जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी याबाबत थेट उपराष्ट्रपती व राज्यसभेचे पदसिद्ध सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये संसदेतील सुरक्षेचा भंग आणि त्यापाठोपाठ विरोधी पक्षांच्या खासदारांचं निलंबन याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, १३ डिसेंबर रोजी दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारण्याच्या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेबाबत चिंता वाटत असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
शरद पवार यांचं ट्विट
Requesting the Vice President of India Shri. Jagdeep Ji Dhankhar to setup an urgent inquiry on the recent security lapse in parliament and the suspension of MPs pic.twitter.com/KN96jRFXlN
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 19, 2023