MLA Chirag Patel resigns: गुजरातमधील खंभातमधील काँग्रेस आमदार चिराग पटेल यांनी विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. खंभात काँग्रेस आमदारपदाचा राजीनामा सादर केल्यानंतर चिराग पटेल यांनी पक्षावर गंभीर आरोप केला आहे. पटेल यांनी “काँग्रेसमधून राजीनामा देण्याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे पक्षाची विचारधारा जी देशाच्या विरोधात असून काँग्रेस नेत्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन नाही.” असे म्हणत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यात आम आदमी पार्टीचे विसावदरचे आमदार भूपेंद्र भयानी यांनी राजीनामा दिला होता, आज खंभातमधील काँग्रेसचे आमदार चिराग पटेल यांनी राजीनामा दिला आहे.
विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ १७ आहे. दरम्यान, आजच्या पटेल यांच्या राजीनाम्यानंतर आज 16 वर आले आहे. एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठका सुरू आहेत, तर दुसरीकडे गुजरातमध्ये आप आणि काँग्रेसचे आमदार पक्षाला रामराम ठोकताना दिसत आहेत.
काँग्रेस आणि आपचे इतर आमदारही भाजपच्या रडारवर आहेत. भूपेंद्र भयानी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला भाजपने आप आणि काँग्रेसमधून राजीनामा दिलेल्या नेत्यांसाठी स्वागत पार्टीचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विसावदरमधील आपचे आमदार भूपेंद्र भयानी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. गुजरातमधील आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे.