पाठपुरावा करण्याचे जि. प. अध्यक्षा पानसरे यांचे आश्वासन ः खेड पंचायत समितीच्या वतीने सत्कार
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यातील पंचायत समिती हा दुवा आहे; मात्र त्यांना निधी येत नसल्याने कामे करता येत नाहीत. 14वा व 15व्या वित्तआयोगातून पंचायत समितीच्या सदस्यांना निधी मिळण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करील. राज्य आणि केंद्राकडे यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन नवनिर्वाचित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी राजगुरूनगर येथे केले.
खेड तालुक्याच्या व पंचायत समितीच्या वतीने पानसरे यांचा जाहीर सत्कार खेड पंचायत समितीच्या पटांगणात करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती अरगडे, माजी जि. प. सदस्या सुरेखा मोहिते, अरुण चांभारे, जि. प. सदस्या दीपाली काळे, तनुजा घनवट, बाबाजी काळे, खेड पंचायत समिती सदस्य भगवान पोखरकर, नंदा सुकाळे, मंदा शिंदे, वैशाली दौंडकर, सुनीता सांडभोर, सुभद्रा शिंदे, अरुण चौधरी, चांगदेव शिवेकर, वैशाली जाधव, कैलास लिंभोरे, बाबा राक्षे, अशोक राक्षे, विनायक घुमटकर, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, पशुवैद्यकीय अधिकारी कैलास कोहिणकर, कृषी अधिकारी बाळासाहेब, मांदळे यांच्यासह खेड पंचायत समितीचे सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
अध्यक्षा पानसरे म्हणाल्या, पुणे जिल्ह्याबरोबर खेड तालुक्याला जास्तीत जास्त प्राधान्य देऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील. समाजातील सर्व स्थरांतील नागरिकांना नागरी सुविधा आणि शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न राहील. विकासकामे करताना प्रसंगी आक्रमक भूमिका घेतली जाईल. अधिकारीवर्ग व पदाधिकारी यांच्या सहकार्यातून कामे मार्गी लावली जातील. जिल्ह्याबरोबरच खेड तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहितेपाटील यांच्या मार्गदर्शनातून विकास कामे केली जातील.
माजी जि. प. सदस्या सुरेखा मोहिते म्हणाल्या, राजकारणविरहित खेड तालुक्यात यापुढे अध्यक्ष जि. प. सदस्य व सर्व पंचायत समितीच्या सदस्यांनी काम करायचे आहे. खेड तालुक्याला गेली अनेक वर्षानंतर अध्यक्षपदाची संधी निर्मला पानसरे यांच्या रूपाने मिळाली आहे. या संधीचा सर्वांनी उपयोग करून घेतला पाहिजे. बाबाजी काळे, कैलास सांडभोर, बाबा राक्षे आदींनी मनोगत व्यक्त केले. तालुक्यातील अनेक संस्था संघटना राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी पानसरे यांचा सन्मान केला. सूत्रसंचालन कैलास दुधाळे यांनी तर माजी उपसभापती भगवान पोखरकर यांनी आभार मानले.
जिल्हा परिषदेच्या अनेक योजना आहेत. त्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहचविण्याचे काम पोस्टमनसारखे पंचायत समितीला करावे लागते प्रत्यक्षात कोणताच निधी मिळत नाही त्यामुळे काम करताना नाराजी येते. 14वा व 15व्या वित्तआयोगात तरतूद करून पंचायत समितीला निधी मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. पुणे जिल्हा परिषद ही सर्वाधिक श्रीमंत जिल्हा परिषद आहे. तिच्या अध्यक्षपदाची प्रथमच खेड तालुक्याला संधी मिळाली आहे. जि. प. चा जास्तीचा निधी खेड तालुक्याला मिळाला पाहिजे. निधी मिळण्यासाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही काम करीत आहे. त्यासाठी जि. प. अध्यक्ष व सदस्यांची मोलाची साथ मिळावी.
-अंकुश राक्षे, सभापती खेड पंचायत समिती