Sharad Pawar Mumbai residence Silver Oak attacked by agitating ST Workers
मुंबई – गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कामगारांनी शुक्रवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी उग्र आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करत सिल्व्हर ओक परिसरामध्ये प्रवेश करत चपला व दगडफेक केली. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या या हल्ल्याचे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा सुनियोजित कट असल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्याबाबत गंभीर दावा केला आहे.
शरद पवारांच्या घराची रेकी
“परवा साहेबांच्या (शरद पवार) घरी हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ नव्हता. त्यांनी शरद पवारांच्या घराची रेकी केली होती. त्यांना शरद पवारांना शारिरीक इजा करायची होती. महाराष्ट्राचं नशीब असं काही घडलं नाही.” असा दावा आव्हाड यांनी केला आहे.
सदावर्ते, १०९ आंदोलकांना अटक
दरम्यान, शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. तसेच उग्र आंदोलनात सहभागी असलेल्या १०९ आंदोलकांना देखील अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सदावर्ते यांची ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तर १०९ आंदोलकांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
आंदोलन आणखी चिघळणार?
तत्पूर्वी, गुरुवारी (ता.७) न्यायालयाने आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या विलनीकरणाच्या मागणीखेरीज बहुतांश मागण्या मान्य करणारा निर्णय दिला होता. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील व आंदोलक कर्मचाऱ्यांनी मोठा जल्लोष देखील केला होता. यानंतर पाच महिन्यांपासून सुरु असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेतले जाईल असे कयास बांधण्यात आले होते. मात्र शुक्रवारी अचानक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलक धडकले व जोरदार घोषणाबाजी करत हल्ला चढवला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी चिघळणार असल्याचंच दिसतंय.
अजित पवार यांची पोलीस यंत्रणांवर नाराजी
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, या आंदोलनामागे कोणी तरी शक्ती होती असा संशय व्यक्त केला. तसेच हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणांचे अपयश असल्याचे देखील त्यांनी सांगितले.