मुंबई – माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र, ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असे वाटते, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. तसेच कॉंग्रेसजनांना जे वाटले ते त्या बोलल्या, असे म्हणत मंत्री यशोमती ठाकूर यांच्या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले आहे.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले होते. यावर “सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर कॉंग्रेस नेतृत्त्वावर बोलणे टाळावे, असे ट्वीट कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. त्यानंतर आज कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली.
थोरात म्हणाले, राहुल गांधी यांना पक्षात स्वीकारार्हता असून ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात कॉंग्रेस पुन्हा संघटित होत आहे. राहुल गांधी यांनी जीवनात जे दुःख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही उभे राहून ते नेतृत्व करत आहेत. पुढील काळातही ते समर्थपणे नेतृत्व करणार आहेत. ते करत असलेल्या कामाच्या विरोधात भाजपच्या प्रचार यंत्रणा काम करतात, त्याचा हा परिणाम असतो.
राहुल गांधी पुढची वाटचाल यशस्वी करणार आहेत, त्यावर आमचा विश्वास आहे. शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र, ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले असे वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले.