नवी दिल्ली – राष्ट्रपदीपदासाठी विरोधकांचे संयुक्त उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावावर सहमती होण्याची शक्यता वाढली आहे. कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी देण्यासाठी पाठिंबा दिल्याचे संकेतही मिळत आहेत. कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी अलिकडेच मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन पक्षाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला असल्याचे सांगण्यात येत आहे. या पाठोपाठ आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनीही त्यांना फोन करून आपल्या पक्षाचा त्यांना पाठिंबा राहील असा निरोप त्यांना दिल्याचे कळते.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजप आणि विरोधकांची मते यांची तुलना केल्यानंतर या निवडणुकीत विलक्षण चुरस होऊ शकते असे चित्र आहे. विरोधकांची मते एकत्र केली तर ती भाजप व त्यांच्या मित्रपक्षांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे विरोधकांनी एकत्रित निर्णय घेऊन संयुक्त उमेदवार दिला तर भाजपला ते एक मोठे आव्हान ठरू शकते. युपीए आघाडीतील पक्ष आणि शरद पवार यांचे व्यक्तीगत मित्र असलेले पक्ष एकत्र आले तर ती एक मोठी आघाडी होऊ शकेल.
विरोधकांच्या आघाडीतील दोन पक्षांची भूमिका अजून समजलेली नाही. त्यात प्रामुख्याने ओडिशातील बीजेडी पार्टी आणि आंध्रप्रदेशातील वायएसआर कॉंग्रेस हे महत्वाचे आहेत.त्यांनी अजून आपले पत्ते खुले केलेले नाहीत. सोनिया गांधी यांनी 15 जून रोजी दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांनीही सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक स्वतंत्र बैठक बोलावली आहे. त्यातून विरोधकांमध्ये दुफळी निर्माण झाल्याची शक्यता आत्तापासूनच व्यक्त केली जात आहे. पण शरद पवार हे असे एक नाव आहे की त्यावर सर्वच भाजपेतर पक्षांची सहमती होऊ शकते.
या प्रक्रियेत आम आदमी पक्षही महत्वाचा आहे. कारण ते कोणत्याच आघाडीत कधीही उघडपणे जात नाहीत. पण त्यांनीहीं पवारांच्या नावाला संमती दिल्याच्या बातमीने पवारांभोवतीचे वलय आणखी चमकदार झाले आहे. दरम्यान खुद्द पवारांनी या विषयी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. बहुधा अन्य पक्षांच्या अधिकृत निर्णयानंतरच ते यावर भाष्य करतील असे सांगण्यात येते. अशा मोठ्या निवडणुकांमध्ये नेहमीच सवता सुभा मांडणाऱ्या ममता बॅनर्जी याही पवारांच्या नावावर सहमत होऊ शकतात असे सांगण्यात येत आहे.