नवी दिल्ली : ‘हिंदू’ शब्दाचा अर्थ खूप घाणेरडा असून हा शब्द भारतातील नसून मूळ पर्शियन आहे” असे कर्नाटकातील काँग्रेस नेते सतीश जारकीहोली यांनी म्हटले आहे. त्यांच्या या एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. जारकीहोली यांनी ‘हिंदू’ शब्दाचा भारताशी काहीही संबंध नाही, हा शब्द लोक कसा काय स्वीकारु शकतात, असा सवालदेखील यावेळी त्यांनी केला आहे. तसेच या शब्दाचा अर्थ जर कळला तर तुम्हाला लाज वाटेल, असेही जारकिहोली म्हणाले आहेत.त्यांच्या या अशा वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
सतीश जारकीहोली यांनी, “हिंदू शब्दाचा उगम कुठून झाला? हा शब्द आपला आहे का? हा इराण, इराक, उझबेकिस्तान, कझाकिस्तानातील पर्शियन शब्द आहे. या शब्दाचा भारताशी काय संबंध? या शब्दाचा स्वीकार तुम्ही कसा करू शकता? यावर चर्चा व्हायला पाहिजे”, असं जारकीहोली यांनी म्हटलं आहे.
कर्नाटकातील या मंत्र्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या सत्ताधारी भाजपाने समाचार घेतला आहे. जारकीहोली यांचं वक्तव्य चिथावणीखोर असून हिंदूंचा अपमान करणारं आहे, असे भाजपाने म्हटले आहे.
“काँग्रेसने लोकांच्या भावनांचा आणि संस्कृतीचा आदर केला पाहिजे. यात संभ्रम निर्माण करू नका”, अशी टीका कर्नाटकातील उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथनारायणण सीएन यांनी केली आहे. “अनावश्यक वाद निर्माण करू नका, समाजहिताच्या दृष्टीने ते चांगले नाही”, असेही त्यांनी म्हटले आहे.