हॅमिल्टन – करोनाबाबतच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन केल्यामुळे न्युझीलंड क्रिकेट मंडळ पाकिस्तानवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. येथे मालिका खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाला मायदेशी परत पाठवले जाणार असून जागतिक क्रिकेटमध्ये अशी नामुष्की पत्करण्याची वेळ आलेला पाकिस्तान पहिलाच संघ ठरेल.
पाकिस्तान संघ गेल्या 11 दिवसांपासून न्युझीलंडमध्ये विलगीकरणात आहे. मात्र, संघातील काही खेळाडूंनी करोनाबाबतच्या नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांना अद्याप सराव करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातच त्यांना न्युझीलंड क्रिकेट मंडळाने करोनाचे नियम पाळा अन्यथा मायदेशी परत जा, असा इशाराही दिला होता.
मात्र, तरीही त्यांच्याकडून वारंवार नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे आता त्यांना मायदेशी परत पाठवले जाणार असल्याचेही बोलले जात आहे. याबाबतही आता येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. न्युझीलंडमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या 7 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्याकडून हा धोका आणखी अनेकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच याबाबत गांभीर्याने विचार केला जात आहे.