तिरंगी लढतीत अतुल बेनके यांचा 9000 मतांनी विजय
जुन्नर – जुन्नर तालुक्यात झालेल्या चुरशीच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांनी 74958 मते मिळवत विजयाची नोंद केली आहे. अतुल बेनके यांनी शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार शरद सोनवणे यांना 9068 मतांनी पराभूत केले. सोनवणे यांना 65890 मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार आशाताई बुचके यांना 50041 मते मिळाली.
लेण्याद्री येथे झालेल्या मतमोजणीत अतुल बेनके यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अतुल बेनके यांनी 2296 मते मिळवत आघाडी घेतली व ती शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवली. एकूण झालेल्या 26 फेऱ्यांपैकी सोनवणे यांनी तिसऱ्या, आठव्या, तेराव्या व चौदाव्या फेरीत आघाडी घेतली.
मात्र इतर सर्व फेऱ्यांमध्ये बेनके यांनी निर्णायक आघाडी घेत विजय संपादन केला. बेनके यांचे नाव घोषित होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोल-लेझीम व बेंजोच्या तालावर कार्यकर्त्यांसह व नेत्यांनीही ठेका धरला होता. 356 मतदान केंद्रांपैकी 139 क्रमांकाच्या बूथवरील निकाल जाहीर करण्यास तांत्रिक बिघाडामुळे
उशीर झाला.
- बेनके यांच्या विजयाची प्रमुख कारणे
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा
- खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा दांडगा संपर्क
- विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे यांची मिळालेली साथ
- शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा
- राष्ट्रवादीच्या सर्व थरातील कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे राबविलेली प्रचार यंत्रणा