मुंबई – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. कृषिमंत्री अधिकाऱ्यांनाच दारू घेणार का ? असं विचारतात यावरूनच काय ते समजा असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. यावरून आता शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या मिटिंगवेळीही दारुच्या पार्ट्या व्हायच्या, असा गंभीर आरोप पावसकर यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मिटिंग सुरू असताना दारु पार्ट्या व्हायच्या. या पार्ट्यांचे किती व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत ? असा इशारा पावसकर यांनी यावेळी दिला. जर अशा पद्धतीने जाणार असाल. तर आम्हाला व्हिडीओ दाखवावे लागतील असंही पावसकर यावेळी म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना पावसकर यांनी थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
हे सत्तार तुमच्याकडे असताना शिवसेना भवनात पहिल्या रांगेत बसायचे. तेव्हा तुम्हाला आवडत होते. काहीही झालं तरी मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. आता अब्दुल सत्तारांचा राजीनामा मागत आहेत.ही महत्त्वकांक्षा काय आहे? ही राक्षसी नाही? ही महत्त्वकांक्षा राक्षसी महत्त्वकांक्षांच्या पलिकडची आहे, असा घणाघात पावसकर यांनी यावेळी केला.