मुंबई – भारताचा पहिला सुपर हिरो ‘शक्तिमान’ लवकरच आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. मुकेश खन्ना यांनी गेल्या वर्षी सोनी पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत ‘शक्तिमान’ सिनेमाची घोषणा केली होती. तेव्हापासून या सिनेमाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटाबाबत मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत मुकेश खन्ना म्हणाले की, “शक्तिमान’ या बिग बजेट सिनेमा असणार आहे. सध्या त्यावर काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा सिनेमा असेल. 200-300 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती होत आहे. स्पायडर मॅनची निर्मिती करणारे सोनी पिक्चर्स ‘शक्तिमान’ची निर्मिती करणार आहेत. पण करोना महामारीमुळे या सिनेमाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले होते.”
यावेळी त्यांनी शक्तीमानच्या भूमिकेत कोण दिसणार हे स्पष्ट केले नाही. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, ” ‘मी काय बोलणार.. फक्त या भूमिकेची तुलना होऊ नये एवढचं मला वाटते. मात्र हे नक्की की सिनेमा येत आहे. अंतिम घोषणा झाल्यानंतर कळेल मुख्य भूमिका कोण साकारणार आहे. पण मी यात असेन. माझ्याशिवाय शक्तीमान होऊ शकत नाही हे सर्वांनाच माहित आहे.”
‘शक्तिमान’च्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंह?
‘शक्तिमान’ सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सुपरहिरोच्या भूमिकेत दिसून शकतो, असे म्हटले जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेले नाही. दरम्यान शक्तिमान हा ९० च्या दशकातील सुपर हिरो असला तरीही आजच्या काळानुसार त्यामध्ये बदल देखील केले जाणार आहेत. सध्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.