हाथरसमध्ये आप खासदार संजय सिंह यांच्यावर शाईफेक

हाथरस – हाथरसमध्ये आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्या अंगावर आज अज्ञात व्यक्तीने शाई फेकली. सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी संजय सिंह हाथरसमध्ये गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

हाथरसला गेलेले संजय सिंह, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घरातून बाहेर पडले. कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर घराबाहेर संजय सिंह प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याप्रसंगी एका अज्ञात व्यक्तीने अचानक त्यांच्या अंगावर शाई फेकली.

या प्रकारामुळे घटनास्थळावर एकच गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

दरम्यान, आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेबद्दल उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर निशाणा साधला आहे. पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यास पोहोचलेल्या आपचे खासदार संजय सिंह यांच्यावर शाई फेकून, भाजपने आपली काळी बाजू उघड केली आहे. संजय सिंह यांच्यावर जी शाई फेकली गेली, त्याच शाईने योगींच्या काळ्या कारनाम्यांचा काळा इतिहास आणि त्यांच्या गुंडाराजचा अंत लिहिला जाईल, असे आम आदमी पार्टी उत्तर प्रदेशच्या वतीने सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.