मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट सुपरहिट ठरला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने करोडो रुपयांचा गल्ला जमावला. मात्र आता शाहरुख त्याचा मुलगा आर्यन खानसोबत पहिल्यांदा एका कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत. ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये हे दोघे सहभागी होणार आहेत. या शोमध्ये सेलिब्रिटी सहभाग होत असतात. यात सेलिब्रिटींना वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींवर प्रश्न विचारले जातात. लवकरच आता करणच्या शोमध्ये आर्यन आणि शाहरुख उपस्थित राहणार असल्याने चाहतेही या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.
शाहरुख खान कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनमध्ये सहभागी झाला नव्हता, ज्यामुळे चाहत्यांनी त्याला खूप मिस केले होते. परंतु आता कॉफी विथ करणच्या आठव्या सीझनमध्ये चाहत्यांना दुहेरी मनोरंजन पाहायला मिळणार आहे. जिथे पहिल्यांदाच शाहरुख आपल्या मुलासोबत दिसणार आहे. यासोबतच आर्यन आणि किंग खानची बॉन्डिंगही या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. गौरी खानही या शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ‘कॉफी विथ करण’ चा 8 वा सीझन ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात सुरू होऊ शकतो. प्रेक्षकांना हा कार्यक्रम डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
आर्यन खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, स्टार किड ‘स्टारडम’ या वेब सीरिजद्वारे दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. आजकाल तो वेब सीरिजवर खूप मेहनत घेत आहे आणि कॉफी विथ करण मधील त्याची भूमिका त्याच्या कारकिर्दीला नावलौकिक मिळवून देऊ शकते. दुसरीकडे, किंग खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या अभिनेता त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच तो ‘डंकी’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.